नाशिक । राष्ट्रपुरुष ही आपली संपत्ती असून त्यांचे स्मारक हे प्रेरणास्थान असते, त्याचे जतन करणे आपले कर्तव्य आहे, अशा शब्दांत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकमान्य टिळक यांच्या नाशिकरोड येथील पुतळ्याच्या झालेल्या दुर्दशेवर तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
खासदार वाजे यांनी स्वतः नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळील सुभाषरोड परिसरातील लोकमान्य टिळकांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पुतळ्याची स्थिती पाहिली. सध्या हा पुतळा कचर्याच्या ढिगार्याने वेढलेला असून, रंग उडालेला आहे. परिसरात अस्वच्छतेचे वातावरण असून रात्रीच्या वेळी गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर असल्याची तक्रार नागरिकांनी अनेक वेळा केली आहे. पाच दशकांहून अधिक काळ याच ठिकाणी असलेला हा पुतळा सध्या दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याची माहिती समाजमाध्यमांद्वारे समोर आल्यानंतर, लोकमान्य टिळक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या सोबतीने खासदार वाजे यांनी या स्मारकाला भेट दिली.
पुतळा पुनर्स्थापनेची मागणी
खासदार वाजे यांनी २१ जुलै रोजी नाशिक महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून तात्काळ उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुतळा एखाद्या मोकळ्या, स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावा – जसे की महापालिकेचे उद्यान किंवा मोकळा भूखंड – अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उत्सव समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा
लोकमान्य टिळक उत्सव समितीचे अनिकेत शास्त्री, रोहन देशपांडे, संग्राम फडके, विशाल उपाध्याय यांच्यासह अनेक नागरिक व व्यापार्यांनी या पुतळ्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्मारकाचे संरक्षण आणि सन्मानासाठी प्रशासनाने तातडीने हालचाल करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
जगाला भूगोल असतो, परंतु आपल्याला जाज्वल्य इतिहासाची देण आहे. टिळकांसारख्या विभूतींनी हा इतिहास समृद्ध केला आहे. त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी स्मारक उभारली जातात, परंतु त्यांचे जतन हे देखील आपले कर्तव्य आहे. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला योग्य सन्मान मिळावा यासाठी मी कटिबद्ध आहे.
- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक











