मुंबई । राज्यातील औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारामुळे राज्यातील विविध ठिकाणी आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क्स उभारले जाणार असून, सिन्नर हे त्यातील एक प्रमुख केंद्र असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृहात हा करार करण्यात आला. उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे सीईओ पी. वेलारासू, आणि ब्लॅकस्टोन समूहाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
५१२७ कोटींची गुंतवणूक
या करारानुसार राज्यभरात एकूण १० हून अधिक लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रियल पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी ७९४.२ एकर जमीन वापरली जाईल आणि यामध्ये १.८५ कोटी चौ. फूट बांधकाम होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पांमध्ये ५,१२७ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक (FDI) होणार असून, २७,५१० थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
सिन्नरसह येथे उभारले जाणार प्रकल्प
हे लॉजिस्टिक पार्क्स नागपूर, भिवंडी, चाकण, खंडवा, सिन्नर आणि पनवेल यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी विकसित केली जातील. हे प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल पायाभूत सुविधा युक्त, आणि महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण २०२४ शी सुसंगत असतील.











