महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; 2 भाविकांचा मृत्यू, कशी झाली घटना?

बाराबंकी । उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील प्रसिद्ध औसनेश्वर महादेव मंदिरात सोमवारी पहाटे भीषण अपघात घडला. मध्यरात्री 2 वाजता जलाभिषेकासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत अचानक विद्युत प्रवाह पसरल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला व लहान मुलांसह 29 जण जखमी झाले आहेत.

माकडांच्या उड्यांमुळे अपघात?
जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही माकडांनी विजेच्या तारेवर उड्या मारल्यामुळे एक वायर तुटली आणि मंदिर परिसरातील टिन शेडवर पडली. त्यामुळे विद्युत प्रवाह जमिनीवर पसरला. करंट लागताच लोकांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. पळून जात असताना अनेक जण चिरडले गेले.

दर्शनासाठी जमले होते हजारो भाविक
अपघात घडला तेव्हा मंदिरात सुमारे 3 हजार भाविक उपस्थित होते. श्रावणातील सोमवारी मंदिरात दर आठवड्याला जवळपास 2 लाख भाविक भेट देतात. अपघातानंतर पोलिसांनी आणि आरोग्य यंत्रणांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने हैदरगड सीएचसी, त्रिवेदीगंज सीएचसी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सीएमओ व अधिकार्‍यांची माहिती
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अवधेश यादव यांनी सांगितले की, 29 जणांना हैदरगड सीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं. यातील दोन जणांचा वाटेतच मृत्यू झाला. 10 जखमींना त्रिवेदीगंज सीएचसीमध्ये तर एकाला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आता सर्व रुग्णांना आवश्यक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे.

घटनेनंतर मंदिर परिसरात नियंत्रण
अपघातानंतर दोन तास मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण होते. मात्र, प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आता मंदिरात पुन्हा भाविक शांतपणे दर्शन घेत आहेत आणि जलाभिषेक सुरू आहे.

error: Content is protected !!