नाशिक । नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने पेट्रोल पंप चालकांना वाहनधारकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सीएनजी पुरवठा करणार्या एमएनजीएल विरोधात पंप चालकांनी २६ एप्रिलपासून संपाची हाक दिली होती मात्र सोमवार (दि.२१) रोजी एमएनजीएल अधिकारी आणि पेट्रोल डिलर असोसिएशनच्या पदाधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला आहे. त्यानूसार प्रत्येक पंपाला रोज चार टँकर देण्याचे कंपनीने मान्य केले आहे.
नाशिक शहरात १३ सीएनजी पंप आहेत. या पंपांवर दररोज सुमारे २०० टँकर सीएनजी पुरवठा केला जातो मात्र गेल्या आठवडाभरापासून अवघे २० टँकर पुरवठा करण्यात येत आहे. याउलट एमएनजीएल कंपनीच्या पंपावर मात्र पुरवठा सुरळित असल्याने पेट्रोल पंप चालकांनी नाराजी दर्शवली. शहरातील सीएनजी पंपावर पहाटेपासूनच वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. तर अनेक ठिकाणी वाहनधारक आणि पेट्रोलपंप चालकांमध्ये खटके उडत असल्याचे दिसून आले.
सीएनजी पुरवठा करणार्या एमएनजीएल कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता शहरातील सीएनजी पंप चालकांनी अंतिम इशारा दिला आहे की, 25 एप्रिलपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 एप्रिलपासून सर्व सीएनजी पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर सोमवार (दि.२१) रोजी एमएनजीएल अधिकारी आणि पेट्रोल डिलर असोसिएशनच्या पदाधिकार्यांसमवेत बैठक घेण्यात आली या बैठकीत महिनाभरात पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन कंपनी प्रतिनिधींनी दिले. तसेच प्रत्येक पंपाला दररोज चार टँकर देण्याचे आश्वासन देण्यात आले. कंपनीकडून आश्वासन देण्यात आल्याने पेट्रोल पंप चालकांनी २६ एप्रिल रोजीचा संप तुर्तास मागे घेतला आहे.










