नाशिक । जम्मू-काश्मिरमधील पेहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ६१ पर्यटक पर्यटनासाठी गेले असून, ते सध्या विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यापैकी एकजण पेहलगाम येथे असून तो सुखरूप असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मंगळवारी (ता.२२) पेहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मिरमध्ये गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ८० ट्रॅव्हल्स कंपन्यांशी संपर्क साधून, पर्यटकांची स्थिती आणि त्यांचा परतीचा मार्ग जाणून घेतला. या अहवालानुसार ५० पर्यटक ट्रॅव्हल्स कंपन्यांमार्फत तर ११ पर्यटक स्वतःच्या खर्चाने पर्यटनासाठी गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यातील १० पर्यटक श्रीनगरमध्ये आणि १ पर्यटक पेहलगाममध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व पर्यटक सुखरूप असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. हे सर्व पर्यटक सुखरूप असून लवकरच त्यांना नाशिकमध्ये आणण्यात येईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
मदत कक्ष कार्यान्वित
राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंत्रालयात मदत कक्ष सुरू केला असून, या कक्षाचे संचालन विशेषकर सूर्यवंशी व नितीन मसळे करत आहेत. नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे:
दुरध्वनी: ०२२-२२०२७९९० / २२७९४२२९
भ्रमणध्वनी: ९३२१५८७१४३
टोल फ्री क्रमांक: १०७०
जिल्ह्यातील ६१ पर्यटक जम्मू-काश्मिरमध्ये अडकले असून ते सर्व सुखरूप आहेत. परतीसाठी शासन प्रयत्न करत आहे. काही खासगीरित्या गेलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी अजून प्रशासनाशी संपर्क साधलेला नाही.”
- राजेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक











