नाशिक । दर्जेदार आणि परवडणार्या आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनातून कार्यरत असलेल्या एसएमबीटी रुग्णालयातील डॉक्टरांनी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठवला आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमधील चार डॉक्टरांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सादर करत उल्लेखनीय यश मिळवले असून, त्यांच्या कार्याची दखल देश-विदेशातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून घेतली जात आहे.
हृदयविकार क्षेत्रातील नावाजलेले नाव – डॉ. वर्मा
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक आणि ख्यातनाम कार्डियोलॉजिस्ट डॉ. गौरव वर्मा यांनी हृदयविकाराच्या अत्याधुनिक उपचारांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यांनी इंडिया लाईव्ह 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेत तीन क्लिष्ट हृदयविकार प्रकरणे सादर करून 3000 पेक्षा अधिक कार्डियोलॉजिस्ट आणि 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची वाहवा मिळवली. BMV, BAV, BPV अशा बलून-आधारित हार्ट व्हॉल्व्ह उपचारांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे.
शस्त्रक्रिया क्षेत्रातील अवलिया – डॉ. नितीन बस्ते
सर्जरी विभागप्रमुख डॉ. नितीन बस्ते यांनी 10,000 हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी AMASICON 2024 मध्ये बेस्ट व्हिडिओ सादरीकरण पुरस्कार मिळवला असून, SAGES 2025 या कॅलिफोर्नियामधील परिषदेत सहभाग घेत 55.50 AMA क्रेडिट्स प्राप्त केले. त्यांच्या नावावर 30 हून अधिक आंतरराष्ट्रीय सादरीकरणे व 11 संशोधन लेख आहेत.
आयसीयु तज्ञ – डॉ. रुचिरा खासने
क्रिटिकल केअर विभागाच्या प्रमुख डॉ. रुचिरा खासने यांना देश-विदेशातील क्रिटिकल केअर परिषदांमध्ये तज्ज्ञ वक्ता म्हणून आमंत्रित केले जाते. त्यांनी ESICM् (पॅरिस), एशिया पॅसिफिक परिषद आणि नेपाळमधील त्रिभुवन रुग्णालयात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या संशोधनात हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल आणि ऑक्सिजन थेरपी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.
‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ विजेते – डॉ. यशवंत रहाडे
डॉ. यशवंत रहाडे यांनी कोलकात्यात झालेल्या WCES परिषदेत ASSPES या शोधनिबंधासाठी ’बेस्ट पेपर अवॉर्ड’ मिळवला. IFSES अंतर्गत झालेल्या या परिषदेत ३०० हून अधिक सादरीकरणांमधून त्यांच्या संशोधनाची निवड मुख्य व्यासपीठासाठी झाली. त्यांना हा पुरस्कार भारताचे भावी सरन्यायाधीश मा. न्या. बी. आर. गवई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.











