शिवशाही बसवर कोसळला स्लॅब, सिन्नर बस स्थानकातील दुर्घटना

नाशिक । नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागात रविवारी दूपारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच सिन्नर बस स्थानकात एक मोठी भीषण घटना घडली. बस स्थानकाच्या प्लॅट फॉमवर एक शिवशाही बस उभी असतांना या बसस्थानकाचा स्लॅब बसवर कोसळल्याने एकच धावपळ उडाली. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून बस स्थानकात इतर बसेसना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

सिन्नर येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदार निधीतून बस टर्मिनल उभारण्यात आले आहे. २०१६ मध्ये हे टर्मिनल नागरीकांसाठी खुले करण्यात आले. नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर हे एक बसस्थानक असल्याने या बस स्थानकातदररोज बसेसची मोठी वर्दळ असते.

नाशिक जिल्हयात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अशातच सिन्नर बस स्थानकात प्लॅट फॉर्म क्रमांक ६ वर शिवशाही बस येऊन उभी होती. अचानक बस स्थानक आवारात मोठा आवाज झाला. ज्या सहा नंबरच्या प्लॅट फॉर्मवर ही बस उभी होती या बसवर स्थानकाच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने एकच घबराट निर्माण झाली. यावेळी बस स्थानक आवारात उभ्या असलेल्या नागरीकांनी बसच्या दिशेने धाव घेतली.

या बसमध्ये काही प्रवासी असल्याचे समजते. यावेळी बस प्रशासनाने आपत्कालीन दरवाज्यातून या प्रवाश्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले तर या बस स्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या एका कारवर देखील स्लॅबचा काही भाग कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही मात्र प्रवाश्यांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. बस स्थानकाचा स्लॅब कोसळल्याने या टर्मिनच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेनंतर स्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या प्रवाश्यांनी भीती पोटी स्थानक सोडून पळ काढला. तर परिसरातील दुकानेही तातडीने बंद करण्यात आली. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून स्थानक परिसर रिकामा करण्यात आला असून अग्निशमन पथकाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. तर बाहेरून येणारया बसेसना स्थानकात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

error: Content is protected !!