Maharashtra News : आता कधीही खरेदी करा, राज्यातील दुकाने २४ तास सुरू ठेवता येणार

मुंबई । राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

यानुसार आता सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर, करमणुकीच्या इतर जागा आणि इतर आस्थापना यासाठी हा निर्णय लागू असेल. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मधील कलम 11 अन्वये एखाद्या क्षेत्रासाठी किंवा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी आणि निरनिराळ्या कालावधीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या आस्थापनांच्या किंवा आस्थापनांच्या वर्गाच्या किंवा वेगवेगळ्या परिसंस्था, व्यापारी संकुल किंवा मॉल यांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचे अधिकार राज्य सरकारला प्रदान करण्यात आले आहेत.

साप्ताहिक सुटीचे बंधन नाही पण…
आस्थापनांनी आठवड्यातून एक दिवशी आपले व्यवहार बंद ठेवण्याबाबत म्हणजे साप्ताहिक सुटीबाबत कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. परंतु, महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 च्या कलम 2 (2) मध्ये ‘दिवस’ याची व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणारा 24 तासांचा कालावधी अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच सदर अधिनियमाच्या कलम 16 (1) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुली ठेवता येतील. मात्र, तेथील प्रत्येक कर्मचार्‍यास आठवड्यातून 24 तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद आहे.

या दुकानांना बंदी
यामध्ये परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक अशा सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केले जाते तसेच वाईन आणि सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आस्थापनांना २४ तास सुरू ठेवता येणार नाही.

error: Content is protected !!