नाशिक । महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अलीकडेच एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान ते मोबाईलवर ‘रमी’ हा ऑनलाईन गेम खेळत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकारावरून विरोधकांनी कोकाटे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांचा राजीनामा मागितला आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री कोकाटे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी विरोधकांकडून होणार्या आरोपांना फेटाळून लावत, गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला.
शिवसेनेचा पत्ताफेक आंदोलन
पत्रकार परिषदेनंतर कोकाटे नाशिकरोडकडे जात असताना शिवसेना (ठाकरे गट)च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाच्या दिशेने पत्ते फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या प्रकारामुळे क्षणिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजकीय पडसाद वाढले
रमी गेम प्रकरण समोर आल्यानंतर राज्याच्या विविध भागांतून संताप व्यक्त करण्यात आला. लातूरमध्ये देखील याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या वेळी झालेल्या गोंधळात राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्याला राजीनामा द्यावा लागल्याची माहिती आहे.
मी सिन्नरचा रहिवासी आहे. आमचेच मंत्री असूनही त्यांनी कधी गावाकडे लक्ष दिलं नाही. मात्र रमी खेळायला त्यांच्याकडे वेळ आहे. म्हणून आम्हीही त्यांच्या सोबत पत्ते खेळायला आलो होतो.
- अस्लम मनियार, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)











