नाशिक । शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नतीचे आदेश जारी केले. यात शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली असून त्यांना बढतीने शिर्डी संस्थानवर पदस्थापना देण्यात आली आहे.

दराडे हे अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असून ते नेवासाचे रहिवासी आहेत. चांदवड येथे उपविभागीय अधिकारी म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर त्यांची धुळे येथे उपविभागीय अधिकारी, जळगाव जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारीपदाची जबाबदारी होती. त्यांनी प्रशासनात विविध पदांवर काम करत महत्वाची भूमिका बजावली आहे. नाशिक येथे प्रशासन उपजिल्हाधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत शासनाने त्यांची प्रतिनियुक्तीवर साई संस्थानमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली.
दराडे यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. नाशिकमध्ये कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वेळेत मिळावेत याकरिता विशेष मोहीम राबवली. त्यांच्या कार्यकाळात सेतू कार्यालयाच्या कामकाजात सुसूत्रता येऊन विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळणे सोयीस्कर झाले. आता देशातील दुसर्या क्रमांकाचे आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिराच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा ते सांभाळत आहेत. देश-विदेशातील भाविकांची दर्शन व्यवस्था, इतर व्यवस्थापन अशी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.









