नाशिक । नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या राजकीय गटांच्या नेत्यांचे लग्नसोहळे चर्चेचा विषय ठरत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय यांचा विवाह सोहळा संपन्न झाला, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शिंदे शेवटी शिंदेंकडेच येणार ना! असे वक्तव्य केल्याने चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे आता पुढील राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, या विवाह सोहळ्यात एकनाथ शिंदे आणि संजय राऊत दोघांनीही वेगवेगळ्या वेळेस उपस्थिती लावली. विशेष म्हणजे शिंदे गटातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांच्याबाबत दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
विलास शिंदे आमचा जुना कार्यकर्ता
कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या घरी मंगल कार्य असलं की, सर्वांनी यायला हवं. शिंदे शेवटी शिंदेंकडेच येणार ना! विलास शिंदे हा आमचा जुना कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा कार्यकर्ता आहे. मी इथे राजकीय भूमिका मांडायला आलो नाही, हे एक मंगल कार्य आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत.
फडणवीसांच्या उपस्थितीत गाठीभेटी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुतण्याच्या लग्नासाठी दोन दिवस नाशिकमध्ये मुक्कामी होते. या काळात विविध पक्षातील नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. यामध्ये ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनीही फडणवीसांची भेट घेतली, ज्यामुळे नव्या राजकीय संधी व चर्चांना अधिक उधाण आले आहे.







