या मुद्द्यावर शिंदे ठाकरे गट येणार एकत्र

कल्याण । राज्यातील शिवसेनेतील फूटीनंतर कट्टर विरोधक बनलेले उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गट आता एका विशिष्ट मुद्द्यावर पुन्हा एकत्र आले आहेत. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी मंदिर बंद ठेवण्याच्या पोलिस प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करत दोन्ही शिवसेना गट आणि हिंदुत्ववादी संघटना ‘घंटानाद आंदोलन’ करणार आहेत.


कल्याणमध्ये 1986 पासून चालत आलेल्या या आंदोलनाचा इतिहास जुना असला तरी यंदा मात्र, दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र येत संयुक्तपणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर डीसीपी अतुल झेंडे यांनी दोन्ही गटांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.

ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी आणि शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर एकाच बैठकीत सहभागी झाले. दोघांनीही हिंदूंच्या मंदिर बंद करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला.


आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले, आम्ही 35 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आदेशानुसार आंदोलन करत आहोत. मुस्लिम बांधव नमाज पठण करत असतानाच मंदिरात आरती करण्याची आमची परंपरा आहे. त्यामुळे मंदिर खुले ठेवण्याची परवानगी मिळावी, ही आमची मागणी आहे.


उपनेते विजय साळवी म्हणाले, बकरी ईदच्या दिवशी हिंदू मंदिर बंद ठेवले जाते हे चुकीचे आहे. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही घंटानाद आंदोलन करत आलो आहोत. संविधानाने आम्हाला दिलेले धार्मिक अधिकार सध्याच्या प्रशासकीय निर्णयामुळे डावलले जात आहेत.

घंटानाद आंदोलनाची परंपरा
1986 साली धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये ‘घंटानाद आंदोलन’ सुरू झाले होते. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर बंद ठेवण्याच्या विरोधात आरती आणि घंटानाद करून आंदोलन करण्यात येते.

error: Content is protected !!