मुंबई । काँग्रेसचे युवा नेते आणि सध्या अपक्ष आमदार असलेले सत्यजित तांबे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सहजासहजी भेटत नाहीत, ते अॅक्सेसेबल नाहीत, असा आरोप करत त्यांनी काँग्रेस नेतृत्वावरच थेट सवाल उपस्थित केला. मात्र या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तांबे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, त्यांना नरेंद्र मोदींच्या भेटीचे खुले चॅलेंज दिले आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, सत्यजित तांबे यांनी मोदींना फोन करून भेट मिळवून दाखवावी, आम्हीही मग बोलू. राहुल गांधी हे जनतेमध्ये मिसळणारे नेते आहेत. प्रत्येक पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो आणि तो पाळला जातो. राहुल गांधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटतात, संवाद साधतात.
तसेच, काँग्रेसमध्ये राहूनही तांबे यांचे वर्तन अलिप्त असून त्यांनी पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ज्यांनी पक्ष सोडण्याचा विचार केला, त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, असे त्या म्हणाल्या.
राहुल गांधींना धमकी देणं कोणासाठीही सोपं नाही, असा इशाराही ठाकूर यांनी दिला. आम्ही शांतताप्रिय आणि अहिंसेवर विश्वास ठेवणारे आहोत, पण हे कलयुग आहे आणि आम्हालाही वेळ आली तर कलयुगासारखं वागता येतं, असा सूचक इशारा त्यांनी ठाकरे गटाच्या काही टीकाकारांनाही दिला.
दरम्यान, सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले असून काँग्रेसमधून त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, ते अद्याप काँग्रेसमध्येच असल्याचा दावा करत आहेत. काँग्रेससोबत त्यांचे संबंध ठिकठाक नसले, तरी ते वेळोवेळी काँग्रेसच्या धोरणांवर भाष्य करत राहतात.











