पावसामुळे सराफ बाजार पाण्यात, आ. फरांदेंनी दिला दोन दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक । दोन दिवसांच्या जोरदार पावसानंतर सराफ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने व्यापार्‍यांचे आणि स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी परिसराला भेट दिली आणि स्मार्ट सिटी योजनेचे तसेच नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर कामकाजात सुधारणा झाली नाही, तर संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल.

या पाहणी दरम्यान, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता धारणकर, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, उप अभियंता नितीन राजपूत, बोरसे, स्मार्ट सिटी प्रकल्प प्रमुख आशिष सूर्यवंशी व सूरज सूर्यवंशी आदी अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे सराफ बाजारात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी साचल्याचे दिसून आले. तासाभरातच सराफ बाजारासह शहरातील बहुतांश रस्त्यावर पाणी साचले होते. दुचाकी वाहनेही पाण्याखाली गेली.त्यामुळे व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त करत स्मार्ट सिटीच्या कारभारावर ताशेरे ओढले. व्यावसायिकांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवयानी फरांदे यांनी सराफ बाजार परिसरात मंगळवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम देत यावर तातडीने उपाययोजना योजण्याचे आदेश दिले. दोन दिवसानंतर पून्हा पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वसूचना असूनही दुर्लक्ष
आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले की, पावसाळ्याच्या सुरुवातीस शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार टाळण्यासाठी आधीच एक बैठक घेण्यात आली होती. त्यात नालेसफाईसह आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, सराफ बाजार परिसरात पाणी साचले आणि दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले, हे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे द्योतक आहे.

सल्लागारांवरही टीका
सराफ बाजार व नेहरू चौक भागातील भूमिगत गटार योजनेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध करूनही स्मार्ट सिटीच्या सल्लागारांनी बदल केल्याने या परिसरात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला. या त्रुटीमुळे नुकसान झाल्याने संबंधित सल्लागार व अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

पुन्हा करणार पाहणी
आमदार फरांदे यांनी जाहीरपणे सांगितले की, त्या दोन दिवसांनी पुन्हा या भागाची पाहणी करणार असून, तोपर्यंत सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कठोर पावले उचलली जातील.

स्थानिक नागरिकांचा संताप
या पाहणी दरम्यान मंडलाध्यक्ष सचिन मोरे, शिवा जाधव, निखिल सरपोद्दार, पवन गुरव, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, नरेंद्र गर्गे यांच्यासह अनेक व्यापारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

error: Content is protected !!