नवी दिल्ली – पेहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात सतत होणाऱ्या सुरक्षेच्या घटनांकडे लक्ष वेधत त्यांनी अमित शाह यांचा राजीनामा मागितला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं, “इस्तीफा दो! पुरा समय सरकारे बनाना और गिराने मे जाता है! राजनैतिक विरोधीयों को खतम करने की साजिश मे 365 दिन दिमाग व्यस्त रहता है, लोगों की सुरक्षा राम भरोसे! अब राम भी ऊब चुका है इन लोगों से! इस्तीफा दो, देश पर मेहरबानी करो!”
या वक्तव्याद्वारे राऊत यांनी केंद्र सरकारवर, विशेषतः गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही सत्ताधाऱ्यांचं लक्ष विरोधकांवर सूड उगवण्यात आणि सरकारं पाडण्यात गुंतलेलं असल्याचा आरोप त्यांनी केला.
पेहेलगाम हल्ल्यातील मृत्यू आणि जखमींवर दु:ख व्यक्त करत त्यांनी स्पष्ट केलं की, “देशात राजकीय स्थैर्यापेक्षा जनतेची सुरक्षितता महत्त्वाची आहे. पण दुर्दैवाने हे सरकार नेमकं त्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे.”
या मागणीमुळे राजकीय वर्तुळात नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.








