नाशिक । कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना थेट इशारा दिला आहे. सोशल मीडियावर भंडारे यांचा नवीन व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, त्यामध्ये त्यांनी थोरात यांच्या समर्थकांचा व्हिडीओही समाविष्ट केला आहे.
भंडारे यांनी गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, थोरात यांनी हल्ल्याचे समर्थन केल्यामुळे आळंदीतील महाराजांच्या गाड्या फोडण्याची चर्चा लोकांमध्ये सुरु झाली आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, माझी गाडी फोडायची असेल तर फोडा, पण कुठल्याही धर्म प्रचारकावर हल्ला केला तर मला माझ्यातला ‘संग्राम बापू भंडारे’ काढून टाकावा लागेल आणि मला फक्त ‘संग्राम भंडारे’ व्हावं लागेल. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय व धार्मिक वर्तुळात खळबळ माजली आहे.
कोण आहे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे?
संग्राम बापू भंडारे कट्टर हिंदुत्ववादी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहे. ते गोवागावी जाऊन कीर्तनातून प्रखर हिंदुत्वाची मांडणी करतात. संगमनेरमधील घुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी केलेल्या काही वक्तव्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आणि कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला.
यानंतर त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणावर बोलताना त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख करत ’आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’, असे म्हणत धमकी दिली. याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यानंतर संगमनेरमध्ये थोरात यांना धमकल्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला होता मात्र आता भंडारे महाराज यांनी पुन्हा एकदा थोरातांना इशारा दिला अहे.











