ब्रह्मगिरी पर्वतावर दगडांची विरण; तीन यात्रेकरू जखमी

त्र्यंबकेश्वर – ब्रह्मगिरी पर्वतावरील गंगाद्वार परिसरात शनिवारी दुपारी दगडांची अचानक विरण होऊन तीन यात्रेकरू जखमी झाले. धुळे येथील विशाल गिरासे (वय २६), जयश्री गिरासे (वय २४) आणि शेगाव येथील नेहा डावरे (वय २८) अशी जखमींची नावे असून, सध्या त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी उपचार सुरू आहेत.

ब्रह्मगिरी पर्वताच्या टोकाजवळील ब्रह्मगुफेच्या दिशेने जाताना यात्रेकरूंवर वरून अचानक दगड कोसळले. त्यावेळी सुमारे ५-६ यात्रेकरू त्या भागात होते. दगडांचा आवाज ऐकून दोन जण वेळीच सावध होऊन बाजूला हटले, परंतु उर्वरित तिघे जखमी झाले. विशाल गिरासे यांच्या बोटांवर, जयश्री गिरासे यांच्या डोक्यावर तर नेहा डावरे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. डॉ. सुशील कुमार शिंदे यांनी रुग्णांवर तातडीने उपचार करत त्यांची प्रकृती स्थिर केली आहे.

घटनेनंतर दगडांच्या गडगडाटाचा आवाज इतका जोरदार होता की, परिसरातील माकडांनीही एकच गोंधळ घालून जंगलात पलायन केले. वनविभागाचे वनरक्षक रवींद्र मौले आणि सहकारी महाले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना अहवाल सादर केला. मात्र, याआधी अनेक वेळा याच परिसरात संरक्षक जाळ्या बसवण्याची मागणी होऊनही अद्याप कुठलीच ठोस कारवाई झाली नाही.

धोकादायक पायर्‍या, मोडकळीस आलेले कठडे
ब्रह्मगिरी पर्वत चढताना असलेल्या जिन्यांच्या अनेक पायर्‍या तुटलेल्या असून कठडेही मोडकळीस आलेले आहेत. यामुळे प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे. तिकिटासाठी ३० रुपये आकारले जात असूनही यात्रेकरूंना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.

मागण्या दुर्लक्षित
ब्रह्मगिरी निसर्ग संवर्धन मंडळाचे ललित लोहगावकर आणि प्रकाश दिवे यांनी वनविभागाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. हिमांशु देवरे यांनी सांगितले की, यापूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जाळ्यांच्या स्थापनेबाबत पत्र देण्यात आले होते. नंतरही राज्यातील वनमंत्र्यांना पुन्हा स्मरणपत्रे देण्यात आली, मात्र काहीच घडलेले नाही.

या आहेत मागण्या
ब्रह्मगिरी पर्वतावर सुरक्षितता वाढवावी.
धोकादायक ठिकाणी संरक्षणासाठी जाळ्या बसवाव्यात.
जिन्यांची दुरुस्ती आणि कठड्यांची नवीन उभारणी करावी.
तिकिटातून मिळणार्‍या उत्पन्नाचा योग्य वापर व्हावा.

error: Content is protected !!