नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला. यावेळी विनायक पांडे बैठकीतून निघून गेले.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक शुक्रवारी शालीमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटासह मनसेचे पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीप्रसंगी जयंत दिंडे हे भाषण करत असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत विधानसभेला एमडी ड्रग्जचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडलो, त्यामुळे वसंत गीतेंचा पराभव झाल्याचे सांगितले. मात्र यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी महापौर विनायक पांडे चांगलेच संतापले. पांडे यांनी थेट जागेवरून उठून दिंडे यांच्या मुद्द्यावर हरकत घेत ते म्हणाले, “जर तसं असते, तर गीते यांना इतकं मोठं मतदान मिळालं असतं का?” असा सवाल करत त्यांनी आक्षेप नोंदवला.
“मी इतकी वर्ष शिवसेनेत काम करतो आहे, उगाच काम करतो आहे का?” या मुद्द्यावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली. वाद इतका वाढला की, पांडे यांनी “आम्ही इतकी वर्ष पक्षात आहोत ते उगाच का?” असे म्हणत बैठकीतून ते निघून गेले. त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले समर्थकही बैठकीतून बाहेर पडले.
या प्रकारामुळे शिवसेनांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, आता पक्षनेते या वादात मध्यस्थी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.











