नाशिक । राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा लाभ नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील १०४८ रुग्णांना तब्बल ९ कोटी ६९ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळाले आहे.
१ मे २०२५ पासून ते १६ जुलै २०२५ या कालावधीत ७५ रुग्णांना ६१.६० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. ही मदत थेट रुग्णालयांना करण्यात आली असून, यामध्ये अपघातग्रस्त, अवयव प्रत्यारोपण, कर्करोग, नवजात शिशू विकार यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात २८ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली असून, महाराष्ट्र दिनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्याचे औपचारिक उद्घाटन झाले. डॉ. चैतन्य बैरागी समन्वयक म्हणून कार्य पाहत असून, प्रकाश भोये व विठ्ठल पाटील या अधिकार्यांचेही मोलाचे योगदान आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत २० गंभीर आजारांवर उपचारासाठी किमान ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. यासाठी रुग्णाने आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला, आधार, रेशनकार्ड, व इतर माहिती विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक आहे.
ही योजना महात्मा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालय, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पात्र नसलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. परदेशी देणगीदारांकडूनही एफसीआरए अंतर्गत निधी प्राप्त होऊ शकतो.
या आजारांसाठी मिळते मदत
अत्यंस्थ कर्णरोपण शस्त्रक्रिया, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, केरो औषधोपचार- किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, बालकांशी संबंधित शस्त्रक्रिया, मेंदू विकार, हृदयरोग, डायलिसिस, भाजलेला रुग्ण, विद्युत अपघात, विद्युत जळित रुग्ण. (भाजलेला रुग्ण, विद्युत अपघात व विद्युत जळित रुग्ण या साठी पोलिसांकडील कागदपत्रे आवश्यक)











