मुंबई । गृह व वाहन कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी! येत्या ६ जून रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आपल्या पतधोरण विषयक बैठकीत रेपो रेटमध्ये पुन्हा कपात जाहीर करू शकते. महागाई दर ४ टक्क्यांपेक्षा खाली असल्यानं, आणि आर्थिक स्थिती स्थिर असल्याचं चित्र असल्यामुळे, रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या रेपो रेट ६ टक्क्यांवर असून, फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यांमध्ये RBI ने सलग दोनदा ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. सध्याची आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, पुढील कपात ही भारताच्या आर्थिक वृद्धीसाठी हितकारक ठरू शकते.
काय आहे रेपो रेट?
रेपो रेट म्हणजे बँका RBI कडून अल्प मुदतीसाठी घेत असलेल्या कर्जावरील व्याजदर. RBI हा दर कमी केल्यास, बँकांकडून देण्यात येणार्या गृह, वाहन वा वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात कपात होते आणि त्याचा थेट फायदा सामान्य कर्जदारांना होतो.
RBI पतधोरण समितीची बैठक ४ जूनपासून सुरू
RBI ची पतधोरण विषयक सहा सदस्यीय समिती 4 जूनपासून बैठक घेणार असून ६ जून रोजी अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा या समितीचे अध्यक्ष असून, त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत रेपो रेटमध्ये दोन वेळा कपात झाली आहे.
कर्जदारांसाठी दिलासा
RBI कडून रेपो रेटमध्ये कपात झाल्यास, गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या हप्त्यांमध्ये थेट घट होणार आहे. त्यामुळे नवीन कर्ज घेणार्यांसह विद्यमान कर्जधारकांनाही मोठा फायदा होऊ शकतो. वाढत्या महागाईच्या काळात ही एक आर्थिक सवलत ठरू शकते.








