मुंबई । राज्यभरात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये आज, ७ जून रोजी, पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत जोरदार सरींची शक्यता वर्तवली असून, नवी मुंबईतही पावसाने सुरुवात केली आहे.नाशिकमध्ये देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत २ जूनपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र आज पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. रायगड जिल्ह्यातही सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.
अलिबाग, मुरूड परिसरात पावसाची संततधार सुरू असून, वादळी वार्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळ रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
राज्यातील इतर भागांमध्येही पावसाचा इशारा
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट, विजांसह पाऊस हे हवामानाचे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर तसेच मुंबई, ठाणे, रायगडमध्येही पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय पालघर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, अमरावती, बीड, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, लातूर, धाराशिव, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्ह्यांनाही हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.
हिंजवडीमध्ये पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा
पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी आयटी पार्क परिसरात काही मिनिटांत जोरदार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. काही ठिकाणी वाहनेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. नालेसफाई आणि ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.






