नाशिक । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बहुप्रतीक्षित नाशिक दौर्यावर आज सकाळी ११ वाजता आगमन झाले. याआधी दोनदा रद्द झालेला दौरा अखेर पार पडताच, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह उसळला आणि जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी सेना, महिला आघाडी आणि असंख्य कार्यकर्ते ठिकठिकाणांहून एकत्र आले होते. शहरात ठिकठिकाणी झेंडे, बॅनर्स आणि घोषणांनी उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. राज ठाकरे यांच्या भाषणांप्रमाणेच त्यांच्या आगमनालाही तरुणांमध्ये विशेष उत्सुकता होती.
दौर्याच्या निमित्ताने विविध शिष्टमंडळांनी राज ठाकरेंची भेट घेतली. याच दरम्यान नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एक कार्यकर्ता उत्साहाच्या भरात पुढे सरसावत ठाकरे यांना टोपी घालण्याचा प्रयत्न करू लागला.
राज ठाकरे यांनी तत्काळ तो प्रयत्न थांबवत “थांब! तू मला टोपी घालणार का?” असा मिश्कील सवाल करत त्याला थोडक्यात रोखले. त्यांच्या या हजरजबाबी उत्तराने उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली.
सत्कारानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्याला उद्देशून, “तुला काय टोप्या घालायच्या आहेत? असे सांगत गमतीशीर माहोल निर्माण केला. या प्रसंगाने त्यांच्या वक्तृत्वशैलीबरोबरच त्यांच्या विनोदी आणि प्रसंगावधानशील स्वभावाचीही झलक कार्यकर्त्यांना अनुभवता आली.










