नाशिक । नाशिकमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठया प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले. दररोज हजेरी लावणार्या या अवकाळी पावसाने कहरच केला असून शहरात ३०० हून अधिक झाडे कोसळून मोठया प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले. उन्हाळयात पावसाळा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र कडाक्याच्या उन्हापासून नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
नाशिकमध्ये सोमवारी झालेल्या पावसाने नाशिकसह कोकण, विदर्भात जोरदार तडाखा दिला. नाशिकमध्ये तर झाड दुचाकीवरून कोसळल्याने गौरव रिपोटे या २१ वर्षी यवुकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच इगतपुरी येथे अंगावर वीज कोसळूल २४ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला.
नाशिकसह राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. नाशिकमध्ये १६ मे पर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भातील पाच जिल्हयांसाठी हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने १४ मे आणि १५ मे साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्हयांमध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील आकाश ढगांनी आच्छादलेले राहील.
दरम्यान, नैॠत्य मोसमी पाउस आज अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. महाराष्ट्र मान्सून नेमका कधी दाखल होणार याबाबत पुणे वेधशाळेने अंदाज व्यक्त केला आहे. पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मान्सून पावसाला सुरूवात झाली आहे. येत्या ६ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा जवळपास १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात महाराष्ट्र, मराठवाडयात सुध्दा जास्त पाऊस पडले असे, पुणे वेधशाळेने म्हटले आहे.









