नाशिक मेडिकल टुरिझम हब म्हणून विकसित करण्यास प्राधान्य- भुजबळ

नाशिक : नाशिक जिल्हा हा शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहे, त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातदेखील आपला जिल्हा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आज नाशिकमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ट्रॉमा सेंटर, नविन वैद्यकीय महाविद्यालये आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे हळूहळू सक्षम केली जात आहेत. यामध्ये शल्यचिकित्सकांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा असून नाशिक हे मेडिकल टुरिझम हब म्हणून विकसित करण्यास प्राधान्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक शल्यचिकित्सक संस्थेच्या वार्षिक परिषद उद्घाटन सोहळा आज मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड रियो नाशिक येथे पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी असोसिएशन ॲाफ सर्जन्स ॲाफ इंडियाचे अध्यक्ष डॅा. प्रविण सुर्यवंशी, महाराष्ट्र स्टेट सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॅा. महेश मालु, माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे, नाशिक सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॅा. नागेश मदनूरकर, सेक्रेटरी डॅा. अमित केले, डॉ.कैलास कमोद, डॉ.सुधाकर जाधव, डॉ.संजीव देसाई, डॉ. नंदकिशोर कातोरे, डॉ.अमित केले, डॉ.पराग धामणे, डॉ. प्रशांत मुठाळ, डॉ.जी.बी.सिंग, डॉ. कैलास मोगल,महाराष्ट्र स्टेट सर्ज्जन्स सोसायटीचे पदाधिकारी, सन्माननीय सर्जन्स उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामाध्यमातून राज्यातील गोर गरीब जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासन अनेक उपक्रम राबवित आहे. या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीत शल्यचिकित्सकांचा सहभाग जितका जास्त असेल, तितकेच हे उपक्रम यशस्वी होऊ शकेल. समृध्दी महामार्गावर शल्यचिकित्सक सोसायटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना आवश्यक ती मदत शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने याचा प्रचार प्रसार होण्यासाठी अशा परिषदा नियमित होणे आवश्यक आहे. एक शल्यचिकित्सक ऑपरेशन थिएटरमध्ये असतो तेव्हा तो केवळ औषधांचा उपयोग करीत नसतो, तर तो विज्ञान, अनुभव आणि धैर्य यांचा संगम साकारत असतो. समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करताना शल्यचिकित्सकांची भूमिका अत्यंत मोलाची असून शल्यचिकित्सक हा समाजातल्या सर्वाधिक जबाबदार व्यक्तींपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी असोसिएशन ॲाफ सर्जन्स ॲाफ इंडियाचे अध्यक्ष डॅा. प्रविण सुर्यवंशी, महाराष्ट्र स्टेट सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॅा. महेश मालु यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॅा. नागेश मदनूरकर यांनी केले.

error: Content is protected !!