कोकाटेंच्या खात्यात बदल ? कृषीमंत्रीपदासाठी या मंत्र्याचे नाव चर्चेत

मुंबई । विधानसभेत सुरू असलेल्या कामकाजादरम्यान मोबाईलवर रमी खेळतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. या प्रकरणावरून झालेल्या टिकेनंतर आता त्यांच्या खात्याबाबत हालचाली सुरू झाल्या असून, सूत्रांच्या माहितीनुसार कृषीखाते मकरंद पाटलांकडे दिले जाण्याची शक्यता आहे.

सध्या मदत व पुनर्वसन विभागाची जबाबदारी सांभाळणारे मकरंद पाटील हे सातार्‍याचे आमदार असून, त्यांच्या खात्याची अदलाबदल करून कृषीखात्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्याचा विचार सुरू आहे. त्याचवेळी मकरंद पाटलांकडील मदत व पुनर्वसन विभाग कोकाटेंकडे सोपवण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कोकाटेंच्या वर्तनामुळे महायुतीतील वरिष्ठ नेते नाराज झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.

कोकाटे यांनी सुरुवातीला यूट्यूबची जाहिरात स्किप करत होतो, असे स्पष्टीकरण दिले असले तरी, विरोधकांनी हे प्रकरण गाजवले आणि सरकारवर टीका केली. यामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर अजित पवार, सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार होती, मात्र ती सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत या खात्याच्या अदलाबदलीबाबत ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सद्यस्थितीत माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद रद्द होणार नसले तरी त्यांच्या खात्यात बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात यासंदर्भात चर्चेला उधाण आले आहे.

error: Content is protected !!