मुंबई | पुणे शहरातील ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामास आता गती मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या कामासंबंधी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांनी १५ दिवसांच्या आत समन्वय साधून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले.
पुण्यातील गंज पेठेतील फुले दांपत्याचे वास्तव्य असलेले फुले वाडा आणि त्याच्या शेजारील सावित्रीबाई फुले स्मारक हे सामाजिक क्रांतीचे प्रतीक मानले जाते. या स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यातील १०० कोटी रुपये वितरितही करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मात्र, अजूनपर्यंत या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
या कामात अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे पुणे महानगरपालिकेने तात्काळ हटवावीत, अशी सूचना देत त्यांनी अधिकाऱ्यांना १५ दिवसात काम सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील असंतोष व्यक्त करत सांगितले की, “कामात झालेली दिरंगाई ही वस्तुस्थिती असून, आता सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.” तसेच या परिसरात काही लोक खाजगी कार्यालये उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात घेत, “स्मारकाच्या आसपास अशा स्वरूपाची कोणतीही खाजगी कार्यालये उभारू देऊ नयेत”, असेही निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस आमदार हेमंत रासने, माजी खासदार समीर भुजबळ, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पुरातत्त्व विभागाचे महेंद्र साक्रे, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रितेश गवळी, अविनाश चौरे व इतर अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेचे आयुक्तांनी यावेळी माहिती दिली की, विस्तारीकरणाच्या जागेत असलेले अनेक रहिवासी स्थलांतरास तयार असून, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) माध्यमातून घरे उपलब्ध करून दिली जातील. जागेची मोजणीही पूर्ण झाली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी सांगितले की, “अलीकडे झालेल्या पुणे दौऱ्यात आम्हाला ५० नागरिक भेटले ज्यांची घरे पूर्णपणे मोडकळीस आली असून ते स्वतः स्थलांतरास तयार आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना प्राधान्याने पुनर्वसन करून उर्वरित काम त्वरित सुरू करावे.











