लासलगाव । सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा अत्यल्प दर आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीवर भूमिका ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.२८) रोजी दुपारी २ वाजता लासलगाव येथे एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट परिसरात पार पडणार असून, त्यामध्ये संघटनेचे राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे आणि जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत कांद्याला मिळणारा भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे, त्यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही बैठक राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तातडीने हस्तक्षेपाची मागणी करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीतील प्रमुख मुद्दे:
सध्याच्या कांदा बाजारभावाचा सविस्तर आढावा घेणे
शेतकर्यांच्या उत्पादन खर्च आणि झालेल्या तोट्याचे विश्लेषण
शासनाकडे अनुदान, हस्तक्षेप खरेदी किंवा किमान आधारभूत किंमत (MSP) लागू करण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांकडे सादर करावयाच्या निवेदनाचा मसुदा तयार करणे
नाफेड व एनसीसीएफकडून होणारी कांदा खरेदी शेतकरीपूरक करण्याचा दबाव
पुढील संभाव्य आंदोलनाची दिशा आणि कृती निश्चित करणे









