नाशिक । शासनाच्या शिवभोजन योजनेत नाशिक जिल्ह्यात गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. या योजनेअंतर्गत गरजू नागरिकांसाठी थाळी उपलब्ध करून दिली जाते, मात्र प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या नावावर गैरप्रकार करत अनुदान उचलल्याचा आरोप काही केंद्रांवर झाला आहे.
तक्रारीनुसार, काही शिवभोजन केंद्रांमध्ये एकाच लाभार्थ्याचा फोटो अनेकदा वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे थाळ्यांची संख्या जास्त दाखवून अनुदानाचा गैरवापर केला जात असल्याचा संशय बळावतो आहे. यामुळे या योजनेचा लाभ खरोखरच गरजूंना मिळतो आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकाराची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाने चौकशीचे निर्देश दिले असून, जिल्हा प्रशासनाने सर्व केंद्रचालकांना मागील तीन महिन्यांचे फोटो अहवाल व सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या केंद्रांकडून माहिती अपूर्ण वा संशयास्पद आढळेल, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अनुदानाची थकबाकी वाढली
दरम्यान, काही केंद्रचालकांनी सरकारकडे फेब्रुवारीपासून थकित असलेल्या अनुदानाबाबत नाराजी व्यक्त केली. सध्या प्रति थाळी ३५ रुपये इतके अनुदान दिले जाते. मात्र, एकूण १ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान अजूनही केंद्रचालकांना मिळालेले नाही. निधी मिळताच ते वितरित केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
.. तर केंद्र रदद करू
शिवभोजन केंद्रावर थाळी वाटपानूसार शासनाकडून अनूदान वाटप केले जाते. त्यामुळे केंद्र चालकांना अनुदान मिळवण्यासाठी थाळी वाटपाची माहिती देणे बंधनकारक आहे. जर कुणाकडे ही माहीती नसेल तर मग त्यांना अनुदान मिळणार नाही. परंतू एकाच व्यक्तीचे फोटो अनेकदा वापरून जर चुकीच्या पध्दतीने अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला जात असेल तर निश्चितपणे त्या केंद्रावर कारवाई केली जाईल.
जलज शर्मा, जिल्हाधिकारी
गंभीर चौकशीची शक्यता
सदर प्रकरणी दखल घेतली असून सर्व केंद्र चालकांनी तीन महिन्याांच अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवभोजन योजनेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही.
कैलास पवार ,जिल्हापूरवठा अधिकारी










