संजय राऊत, मोर्चा काढण्यापूर्वी शेतक-यांना खिशातून मदत द्या

भाजप माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा टोला

मुंबई : पूरपरिस्थितीने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शिवसेना उबाठा गटाच्यावतीने शेतकरी कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र संजय राऊत, उबाठा गटाने पूरग्रस्त शेतक-यांना दमडीचीही मदत केली नाही. 11 ऑक्टोबरला मोर्चा काढण्याची भाषा करणा-या श्री. राऊत यांनी मोर्चा काढण्याआधी किमान अर्धा किलो ज्वारी – तांदूळ तरी शेतकर्‍यांना द्यावी असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी लगावला.

यावेळी बोलतांना नवनाथ बन म्हणाले, मराठवाड्यात तसेच अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतकर्‍यांची घरदारे, पिके वाहून गेली. त्यांना मदतीची गरज आहे. या स्थितीत भाजपा – महायुती सरकार तत्परतेने धावून आले आहे. शेतक-यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील मदत जमा देखील झाली आहे, उर्वरित शेतक-यांनाही लवकरच मिळणार आहे. महायुतीच्या आमदार- खासदारांनी एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त बळीराजासाठी दिले आहे.

राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीची मदत म्हणून सरसकट 5 हजार रोख ,35 किलो धान्य अशी मदत जाहीर केली आहे. शेतकर्‍यांना केंद्राकडूनही लवकरात लवकर भरघोस मदत मिळेल, असेही बन यांनी नमूद केले.

तुमचे हात रिकामे कसे हो?
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आमचे हात रिकामे या वक्तव्यावर टीकेची झोड उठवत श्री. बन म्हणाले की तुमचे हात रिकामे कसे हो? मविआ सरकार असताना कोवीड काळातील भ्रष्टाचार आणि अनेक घोटाळ्यांतून साडेनऊ लाख कोटी आपल्या तिजोरीत तुम्ही भरले आहेत. त्यातील 20 हजार कोटींची मदत तरी राऊत आणि उबाठा गटाने शेतक-यांना द्यायला हवी होती. नौंटंकी करत मोर्चा काढण्याऐवजी शेतक-यांना मदत करा असे आव्हान बन यांनी दिले.

अतिवृष्टीने शेतकरी बेजार, राऊतांचा सुका मेव्यावर ताव
उबाठा गटाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मराठवाडा पाहणी दौ-याचा शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओचा उल्लेख करत बन यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. दौ-यादरम्यान उद्धव ठाकरे पाहणी करत असता खा. संजय राऊत एसी मर्सिडिज मधे बसून सुका मेवा खात होते. राऊतांना गाडीतून खाली उतरून शेतक-यांची व्यथा जाणून घ्यावी असेही वाटले नाही. राऊतांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. त्रस्त शेतक-यांची राऊत आणि उबाठा गट क्रूर थट्टा करत आहेत. शेतक-यांची क्रूर थट्टा केल्याबद्दल राऊत यांनी माफी मागायला हवी असेही बन म्हणाले.

error: Content is protected !!