नाशिक : नेपाळमध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याने नाशिक शहरातील चार पर्यटक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. अंबड येथील मंगला गोसावी, रामगीरी गोसावी, सुनीता आहेर आणि भास्कर आहेर हे चौघे 7 सप्टेंबर रोजी काठमांडूला पर्यटनासाठी गेले होते. सध्या ते पोखरा येथील एका हॉटेलमध्ये थांबले असून त्यांचे परतीचे काठमांडू-मुंबई विमान तिकीट 12 सप्टेंबरचे आहे. मात्र बाहेरील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांना मायदेशी परतता आलेले नाही.
पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी त्यांच्या चिरंजीव अनिल गोसावी यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडे मदतीची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी राज्य नियंत्रण कक्षाला माहिती दिली असून शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच, नाशिक जिल्ह्यातील जे नागरिक पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेले असतील त्यांनी तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.
दरम्यान, नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तेथील तरुणांच्या आंदोलनामुळे हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांचे नागरिक तेथे अडकून पडले आहेत. नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने सर्व परदेशी नागरिकांना नेपाळ आर्मीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच हॉटेल्स, पर्यटन उद्योजक आणि अन्य संस्थांच्या मदतीने आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
नेपाळ आर्मी संपर्क क्रमांक :
☎️ +९७७-१-५९७९२२४, +९७७-१-५७९२२३, +९७७-१-५९७९०६१, +९७७-९८५१०७२९१४
📧 [email protected]











