नाशिक । नाशिक महानगरपालिकेकडून आता पाणीपट्टीसाठी ’स्पॉट बिलिंग’ प्रणाली राबवली जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ प्रशासक तथा आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते नुकताच झाला. यासाठी महापालिकेने ‘कॅनबेरी एनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या एजन्सीची नियुक्ती केली असून कामकाज सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील पाणी मीटरची तपासणी, नवीन मीटर बसवण्याचे निर्देश तसेच अनधिकृत नळ जोडण्या शोधून काढण्याची मोहिम राबवली जाणार आहे. २,०० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकीची वसुली करण्यासाठी पाणीपट्टी देयकांचे खासगीकरण आणि स्पॉट बिलिंग हा महापालिकेचा उपाय.
एजन्सीमार्फत नळ कनेक्शनधारकांचा मोबाईल व ई-मेल डाटा, संपूर्ण पत्ता, व बिल देयक वाटप यांची नोंद केली जाणार. स्पॉट बिलिंग दरम्यान पाणी मीटर आहे की नाही याची तपासणी होणार. ज्या कनेक्शनधारकांकडे मीटर नाही, त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात येईल. मुदतीत मीटर न बसवणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. पाणी गळती आणि थकबाकीमुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला मोठा आर्थिक फटका बसत आहे, त्यामुळे या प्रणालीमुळे महसूल वाढ आणि कार्यक्षमता सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासक मनीषा खत्री यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, ज्या ग्राहकांनी अजून मीटर बसवलेले नाहीत, त्यांनी त्वरित मीटर बसवून नोंदणी करून घ्यावी.










