नाशिक : शहरातील ग्लॅडिएटर्स तायक्वांदो अकॅडमीच्या दोन उदयोन्मुख खेळाडू – वंशिका मोटाळे आणि स्वराली वराडे – यांनी राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. पंजाबमधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पघवारा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय निवड शिबिरात (इंडिया कॅम्प) या दोघींची मलेशिया येथे होणाऱ्या आशियाई तायक्वांदो चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.
या निवडीमुळे नाशिकचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात उजळले आहे. वंशिका आणि स्वराली यांनी मागील काही वर्षांत विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांच्या या मेहनतीला आता मोठे यश लाभले आहे.
ग्लॅडिएटर्स अकॅडमीचे प्रशिक्षक अमोल अनिल राठोड यांनी सांगितले की, “ही निवड म्हणजे वंशिका आणि स्वरालीच्या कठोर परिश्रम व समर्पणाचे फळ आहे. आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आम्ही त्यांना आगामी स्पर्धेसाठी विशेष प्रशिक्षण देत आहोत.”
इंडिया कॅम्पमध्ये देशभरातील निवडलेल्या खेळाडूंना एकत्र आणून, त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर भारताचे अंतिम प्रतिनिधी मंडळ निवडले जाणार आहे, जे मलेशियात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नाशिकमधील क्रीडाप्रेमींमध्ये या निवडीमुळे आनंदाचे वातावरण असून, वंशिका आणि स्वरालीकडून आंतरराष्ट्रीय पदकाची अपेक्षा ठेवली जात आहे. त्यांच्या या यशामुळे नाशिकचा क्रीडा नकाशा आणखी उजळून निघाला आहे.











