नाशिक । राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याचे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. दिवाळीनंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून डिसेंबर अखेरपासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पडतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक आणि नव्याने तयार झालेल्या अहिल्या नगर या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ही बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी मागील चार महिन्यांपासून आयोगाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.या बैठकीत मतदान केंद्र निश्चिती, मतदार यादीतील अद्यतने, निवडणूक साहित्य आणि मनुष्यबळ आदी बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.
प्राथमिक आकडेवारी व तयारी
नाशिक विभागातील एकूण मतदारसंख्या: ५० लाख ४५ हजार
निश्चित करण्यात आलेली मतदान केंद्रे: ४,९८२
मतदान यंत्रांची (युनिट्स) गरज: सुमारे ८,५०० युनिट्स
मनुष्यबळाचा आढावा: आवश्यक कर्मचारी व पथकांची आखणी
३० टक्के मतदान केंद्रांची वाढ: मागील निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांमध्ये ३०% वाढ
निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निर्णय
मतदार निश्चितीची अंतिम मुदत: १ जुलैपर्यंतच्या मतदार यादीतील नावे ग्राह्य धरली जाणार
नवीन मतदारांची भर किंवा वगळणे: याचा अधिकार आयोगाकडे नाही
वॉर्ड रचना: २०११ च्या जनगणनेनुसार निश्चित करण्यात आलेली
ओबीसी आरक्षण: लॉटरी व रोटेशन पद्धतीने होणार
प्रभाग रचना व आरक्षण: वेगवेगळ्या प्रारूपानुसार प्रभाग व वॉर्ड आरक्षण ठरणार
फेज व्हाईज निवडणुका: टप्प्याटप्प्याने निवडणुका पार पडणार
निवडणूक प्रक्रिया: स्टँडर्ड पद्धतीनुसार पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे उद्दिष्ट








