नाशिक । महापालिकेकडून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील कामे हाती घेण्यात आली आहेत. यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश देण्यात आले.
आयुक्त मनिषा खत्री यांनी अधिकार्यांसमवेत मिरवणूक मार्गाची पाहणी केली. पाहणी करताना रस्त्यातील अडथळे, अतिक्रमण, खड्डे बुजवणे तसेच ओव्हरहेड वायर्स व केबल्स तातडीने हटविण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपआयुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाइत, रवींद्र धारणकर, विभागीय अधिकारी तथा नगर सचिव मदन हरिश्चंद्र, चंदन घुगे, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, गणेश मईड, उपअभियंता समीर रकते, प्रशांत बोरसे आदी अधिकारी उपस्थित होते.
असा असेल मिरवणूक मार्ग
वाकडीबाराव, दूध बाजार, मेन रोड, धुमाळ पॉईंट, एम.जी. रोड, रविवार पेठ, रविवार कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल, पंचवटी कारंजा ते रामकुंड परिसर, सरदार चौक, गोदाघाटाकडे मिरवणूक जाईल.
विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानूसार आजपासून काम सुरू होईल.नाशिककरांनी जसा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतआहे, तसेच गणरायाचे विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीने करावे. त्यामुळे गोदावरी नदी व शहरातील इतर नद्या प्रदूषित होणार नाहीत याची काळजी घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.
मनिषा खत्री, आयुक्त , नाशिक महापालिका








