नाशिक । २००६ साली मुंबईतील लोकल रेल्वेमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा वळण घेत, उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय देत दोन आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. या निर्णयानंतर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले मोहम्मद साजिद अन्सारी आणि मुजम्मील रेहमान शेख यांची लवकरच सुटका होणार आहे.
हे दोघेही उच्च शिक्षित असून, अन्सारी यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून सध्या पत्नीच्या आजारामुळे पॅरोलवर आहेत, तर मुजम्मील शेख वकिलीचे शिक्षण घेत आहे. या दोघांना १७ एप्रिल २०१६ पासून नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, नाशिक कारागृह प्रशासनाला या संदर्भात ईमेलद्वारे अधिकृत आदेश प्राप्त झाले असून, त्यानुसार मुक्ततेची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी 6:24 ते 6:35 या वेळेत मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावर एकामागून एक सात स्फोट होऊन संपूर्ण शहर हादरले होते. हे सर्व स्फोट प्रथम श्रेणी डब्यांमध्ये, खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहिम, बोरिवली, माटुंगा आणि मीरा-भाईंदर स्थानकांजवळ झाले. या स्फोटांसाठी प्रेशर कुकरमध्ये RDX, अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळे भरून, टायमरद्वारे बॉम्ब उडवले गेले होते.
या भीषण घटनेनंतर 20 जुलै ते 3 ऑक्टोबर 2006 दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संशयित आरोपींना अटक केली. नोव्हेंबर 2006 मध्ये अटकेत असलेल्या आरोपींनी न्यायालयात जबरदस्तीने कबुलीजबाब घेतल्याचा दावा केला. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या 30 आरोपींपैकी 13 जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे नमूद करण्यात आले.
11 सप्टेंबर 2015 रोजी तब्बल 9 वर्षांच्या सुनावणीनंतर, विशेष मकोका न्यायालयाने निकाल दिला. त्यात 13 पैकी 5 आरोपींना मृत्युदंड, 7 जणांना जन्मठेप आणि 1 आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2016 मध्ये, दोषी ठरवलेल्या आरोपींनी हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत अपील दाखल केले. 2019 मध्ये न्यायालयात सुनावणी सुरू झाली, ज्यामध्ये न्यायालयाने पुराव्यांची आणि साक्षींची सविस्तर तपासणी केली. 2023 ते 2024 या कालावधीत हा खटला तुकड्या-तुकड्यांत सुरू राहिला.










