नाशिक । नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत म्हणजेच २०२१-२०२५ बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ३५ हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ६२हुन अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संवेदनशील मुद्द्याची गंभीर दखल घेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली असून, नाशिकसाठी स्वतंत्र ‘लेपर्ड सफारी अँड कंझर्वेशन प्रोजेक्ट’ मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
खासदार वाजे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नाशिक जिल्ह्याचा निसर्गाशी सुसंवादाचा दीर्घ परंपरेचा वारसा आज भीतीच्या छायेत झाकोळला आहे. बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांचे प्रमाण कमी न होता वाढतच आहे.
अलीकडेच वडनेर गेट परिसरात दोन वर्षीय बालकाच्या मृत्यूच्या घटनेने जनतेत संतापाची लाट उसळली होती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ‘लेपर्ड सफारी प्रोजेक्ट’, तसेच सातारातील “माणिकडोह रेस्क्यू सेंटर” आणि राजस्थानमधील “जयपूर लेपर्ड रिझर्व्ह” ही यशस्वी उदाहरणे आहेत. अशा प्रकारचा समर्पित लेपर्ड सफारी आणि संवर्धन प्रकल्प नाशिकमध्येही उभारल्यास पर्यावरणीय संतुलन, पर्यावरण शिक्षण, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळू शकते असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
खा. वाजे यांच्या मागण्या
बिबट्या कॉरिडॉर आणि हॉटस्पॉट्सचे मॅपिंग करून प्रतिबंधात्मक योजना आखणे.
अधिक पिंजरे, प्रशिक्षित पथके तैनात करणे
AI आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टम तैनात करणे.
स्थानिक समुदायाचा सहभाग घेणे
पर्यटन आणि रोजगार एकत्रीकरण करून बिबट्या संवर्धनाला पर्यटनाशी जोडणे.
जुन्नर पॅटर्ननुसार संघर्षातून सहजीवनाकडे
खासदार वाजे यांनी पत्रात पुणे जिल्ह्यातील जुन्नर लेपर्ड सफारी प्रकल्पाचा (५२ हेक्टर क्षेत्र, ८२ कोटी खर्च, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे सादर झालेला DPR) उल्लेख केला आहे. या प्रकल्पामुळे संवर्धन, पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती एकत्र येत आहे. तसेच माणिकडोह रेस्क्यू सेंटर (महाराष्ट्र) आणि झलाना लेपर्ड रिझर्व्ह (राजस्थान) यांनी यशस्वी संघर्ष व्यवस्थापनाचे उदाहरण निर्माण केले आहे. योग्य दृष्टीकोन आणि शास्त्रीय धोरणांचा वापर केल्यास भीतीचे रूपांतर सहजीवनात, आणि संकटाचे रूपांतर संधीमध्ये करता येते, असे खासदार वाजे यांनी नमूद केले आहे.
हा केवळ वन्यजीव व्यवस्थापनाचा प्रश्न नाही; हा मानवी सुरक्षिततेचा, पर्यावरणीय संतुलनाचा आणि सामाजिक सौहार्दाचा प्रश्न आहे. भीतीचे रूपांतर पुन्हा विश्वासात व्हावे यासाठी माझा प्रयत्न आहे. दीर्घकालीन तसेच अल्पकालीन तात्काळ अशा दोन्हीही उपयोजनाबाबत शाश्वत काम सुरू आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जात आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार,नाशिक लोकसभा











