ताई, आता आमचीही वैष्णवी होऊ देऊ नका!

नाशिकच्या महिलांची महिला आयोगात धाव

नाशिक । ताई, माझ्या बहिणीचा दुसरी वैष्णवी नका होऊ द्या… अशा हृदयद्रावक शब्दांत एका भावाने आपल्या आठ महिन्यांच्या भाचीला खांद्यावर घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. नाशिक इथं रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेत महिला आयोगाच्या वतीने जन सुनावणी घेण्यात आली.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या जनसुनावणीदरम्यान नाशिक जिल्ह्यातून आलेल्या महिलांनी आपल्या सासरच्या घरात होत असलेल्या मानसिक, शारीरिक छळाविरुद्ध आणि हुंडाबळी, मालमत्तेचे वाद, कौटुंबिक हिंसाचार यासारख्या गंभीर प्रकरणांची तक्रार आयोगाकडे नोंदवली.

यावेळी एकूण १०६ तक्रारी दाखल झाल्या, त्यातील बहुतांश तक्रारी कौटुंबिक अत्याचाराच्या स्वरूपाच्या होत्या. सध्या राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरण चांगलेच चर्चत आहेत. मात्र आज नाशिकच्या या जनसुनावणीत आता आमची वैष्णवी होउ देवू नका अशी आर्त साद महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना घातली.

राजेशाही लग्न, पण केवळ तीन महिन्यांत तडा
नाशिकमधील एका युवतीने आपल्या आठ महिन्यांच्या बाळासह जनसुनावणीत धाव घेतली. तिचे पुण्यात राहणार्‍या एका अभियंत्याशी तीन वर्षांपूर्वी नातेवाईकांच्या मध्यस्थीतून लग्न झाले. मुलाकडून राजेशाही थाटाची मागणी झाल्यामुळे तिच्या कुटुंबाने १५ ते २० लाख रुपये खर्च करून थाटामाटात विवाह लावून दिला.

सुरुवातीचे तीन महिने सुरळीत गेले, पण नंतर सासरच्या मंडळींकडून छळ सुरु झाला. सासू-सासर्‍यांकडून अपमान, पतीकडून मारहाण आणि लहान बाळापासून जबरदस्तीने दूर ठेवण्याचे प्रकार घडू लागले. अखेर या महिलेने न्यायासाठी आयोगाचा दरवाजा ठोठावला.

१५ लाखांचा खर्च, आठव्या दिवशी घटस्फोटाची मागणी
नाशिकमध्येच एका उच्चशिक्षित तरुणाशी शासकीय सेवेतील निवृत्त अधिकार्याच्या मुलीचे विवाहसोहळा थाटात पार पडला. वडीलांनी १५ लाख रुपये खर्च करून मुलीला ७ तोळे सोने दिले. मात्र लग्नानंतर केवळ आठव्या दिवशीच मुलाने घटस्फोटाची मागणी केली. हनिमूनच्या खर्चापासून ते घरखर्चाच्या वाटपापर्यंत विविध कारणांवरून वाद निर्माण झाला. ही पीडित महिला देखील आता न्यायासाठी आयोगाकडे आली आहे.

तीन मुली जन्मल्याने पतीने सोडले, दुसरे लग्न
इगतपुरीच्या एका महिलेने आयोगासमोर आपल्या तक्रारीत सांगितले की, तीन मुली झाल्यानंतर पतीने तिला टाकले आणि वंशाचा दिवा हवा म्हणून दुसरे लग्न केले. आधीच घरची परिस्थिती बेताची. आता तीन मुलींना सांभाळत एकटी झुंजणार्‍या या महिलेने आयोगाकडे मदतीची विनंती केली.

उपस्थित मान्यवर आणि पॅनल समित्या
या जनसुनावणीसाठी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपायुक्त प्रशांत बच्छाव, महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तक्रारींच्या नोंदीसाठी ४ वेगवेगळ्या पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यात विधी सेवा प्राधिकरणाचे वकील, पोलीस अधिकारी, समुपदेशक, वन स्टॉप सेंटर, भरोसा सेल व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होते.

error: Content is protected !!