नाशिक । कधी नाशिक महापालिकेवर सत्ता गाजवणारी आणि राज्यात तीन आमदार निवडून देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) गेल्या काही वर्षांत स्थैर्य गमावल्याचे चित्र होते. मात्र आता मनसेने नाशिकमध्ये पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा निर्धार केला आहे. पक्ष संघटनेने विविध स्थानिक मुद्यांवर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्याची दिशा ठरविण्यासाठी १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता राजगड कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे.
नाशिक हा मनसेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून तीन आमदार निवडून आले होते. त्यानंतर मात्र पक्षाची गाडी रूळावरून उतरल्याचे चित्र दिसू लागले. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी घसरली आणि २०२४ मध्ये तर एकही आमदार निवडून आला नाही. ४० नगरसेवक देणार्या नाशिकमधून मनसेला मोठा झटका बसल्याने पक्ष संघटनाही कमजोर झाली होती. असे जरी असले तरी, आजही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे पहायला मिळते. पक्ष सत्तेत जरी नसला तरी पक्षाच्या आजवरच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली.
याअगोदर बँक व्यवहार मराठीत व्हावेत यासाठी केलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारलाही घ्यावी लागली होती. मंत्रिमंडळातील उदय सामंत यांनी खुद्द राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तसेच गुढीपाडवा मेळाव्यात देशातील नद्यांच्या अवस्थेबाबत आवाज उठवल्यानंतर नाशिकमधील गोदावरी नदीच्या प्रदूषणाविरोधात आंदोलन करण्यात आले.
आता नाशिक शहरातील विविध स्थानिक प्रश्नांवर आंदोलनात्मक मार्गाने आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार आहे. राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आजही कार्यकर्त्यांत उत्साह असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे मनसेची आगामी दिशा आणि आंदोलनांचे स्वरूप काय असेल, याकडे आता संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे










