इगतपुरी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत – युतीबाबत मी योग्य वेळी निर्णय घेईन, तोपर्यंत तुम्ही महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा.
इगतपुरी येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय पक्ष शिबिराच्या दुसर्या दिवशी, ठाकरे यांनी वरिष्ठ पदाधिकार्यांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली.
गेल्या काही दिवसांत राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये युती होणार का, याची उत्सुकता वाढली होती. मात्र, ठाकरे यांनी या चर्चांना विराम देत, युतीविषयीचा निर्णय स्वतःच्या अखत्यारीत असल्याचं स्पष्ट केलं. राज ठाकरे म्हणाले –
युतीबाबत कोणीही माध्यमांशी बोलू नये. याबाबत मीच निर्णय घेणार आहे. सध्या सर्व लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे असावं तसंच त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादीत नाव नोंदणी, बूथ पातळीवरील संघटन आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी कामावर भर द्यायला सांगितलं.
राज ठाकरे यांचे सर्वांशी सौहार्दाचे संबंध
या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एमएमआर रीजनमधील कार्यकर्त्यांसोबत झालेल्या संवाद शिबिरात पक्षाच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले, साहेबांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. युतीचा निर्णय हा फक्त राज ठाकरे साहेब घेतील.संघटन हे केंद्रस्थानी आहे. उद्या पक्षाने ’एकला चलो रे’ अशी भूमिका घेतली, तरी ती अयोग्य ठरत नाही.
राज ठाकरे यांचे फडणवीस, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्याशी चांगले संबंध असल्याचं नांदगावकरांनी नमूद केलं. लोक संभ्रमात असतील, तरी आम्ही नाही. योग्य वेळेला सर्व स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
शिबिरात प्रकाश महाजन अनुपस्थित राहिल्याची चर्चा असताना, नांदगावकर यांनी स्पष्टीकरण दिलं . हे शिबिर एमएमआर रीजनपुरते मर्यादित होतं. महाजन आमचे सहकारी आहेत आणि त्यांच्याशी लवकरच चर्चा होईल असे ते म्हणाले.









