नाशिक । भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठी लोकांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्रात दुबेंविरोधात वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता दुबेंविरोधात थेट कायदेशीर पावले उचलली आहेत. मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नुकत्याच घडलेल्या घटनेत, हिंदीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादात दुबेंनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठी जनतेत तीव्र संताप निर्माण झाला. मराठी लोक आमच्या पैशांवर जगतात, तुमच्याकडे उद्योग काय आहेत? असे अपमानास्पद विधान दुबेंनी केले होते. याशिवाय, “तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारू” असे आव्हान त्यांनी दिले.
या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत मनसेने दुबेंना माफी मागण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र, यावर कुठलाही प्रतिसाद न आल्यामुळे अखेर मनसेने न्यायालयात धाव घेतली.
मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी सांगितले, खा. निशिकांत दुबे यांनी सातत्याने मराठी समाजाविरुद्ध विष कालवले आहे. त्यांनी माफी मागावी, ही मागणी आम्ही वारंवार केली. पण त्यांनी ती धुडकावली. त्यामुळे आम्ही आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दुबे नाशिकमध्ये आल्यावर त्यांना धडा शिकवला जाईल.
या प्रकरणामुळे आता राजकीय व सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुढील सुनावणीसाठी निशिकांत दुबेंना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार असून, हा वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.











