नाशिक : नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आता नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही पोलिस आयुक्तांना कारवाईस मोकळीक दिल्याने आता गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली आहे. सत्ताधारी भाजपसह अन्य बड्या नेत्यांची नावे संशयित म्हणून समोर येत असताना काहीजण पोलिस कोठडीत तर काही जण कारागृहात मुक्कामी आहेत. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून अनेकांनी देवाचा धावा सुरू केला आहे. पोलिसांनी रिपाई पदाधिकारी प्रकाश लोंढे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर आता नंबर कुणाचा, याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या महिन्यांपासून शहरातील गुन्हेगारी कळस गाठला आहे. खून, दरोडे, हाणामारी यांसारखी एकही घटना घडली नाही असा एकही दिवस नाशिकमध्ये गेल्याचे दिसत नाही. नाशिकमध्ये भाजपची सत्ता असून नाशिक दत्तक घेणाऱ्या भाजपने गुन्हेगार दत्तक घेतल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे. त्यामुळे भाजपवरचा हा डाग पुसण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता खुद्द मुख्यमंत्र्यांनी आता पोलिस आयुक्तांना कारवाईसाठी मोकळीक दिली. “गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, सोडू नका” असे निर्देश दिल्याने पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.
कारवाईस मोकळीक दिल्याने ठरवले तर पोलिस प्रशासन काय करते हे नाशिक पोलिसांनी काही दिवसांतच दाखवून दिले. त्यामुळेच आता गुंडही म्हणू लागलेत — “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला.” आयटीआय सिग्नल परिसरात एका बारबाहेर झालेल्या राड्यातून गोळीबार केल्याप्रकरणी प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक व भूषण या संशयितांवर गुन्हा नोंदवला. इतकेच नव्हे, प्रकाश लोंढेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्याही दाखवला.
लोंढेनंतर विसे मळा गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांनीही “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” अशी घोषणा दिली. या प्रकरणातील मुख्य संशयित अजय बागूल सध्या फरार आहे.
भाऊ, नाना, अण्णा, दादा झाले पसार
सोशल मीडियावरून रील्सच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेले भाजपचे पदाधिकारी राकेश कोष्टी, विक्रम नागरे, मनसे पदाधिकारी योगेश शेवरे, शिंदे गटाचे पवन पवार देखील फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पुढारी आणि त्यांचे कारनामे
उद्धव निमसे : भाजप माजी नगरसेवक, धोत्रे हत्याप्रकरणात सहभागाचा संशय, सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुक्काम.
जगदीश पाटील : भाजप माजी नगरसेवक, सागर जाधव गोळीबार प्रकरणी संशय, नाशिकरोड कारागृहात मुक्काम.
प्रकाश लोंढे : सातपूर गोळीबार प्रकरण, सध्या नाशिक पोलिस कोठडीत.
दीपक लोंढे : सातपूर गोळीबार प्रकरण, सध्या नाशिक पोलिस कोठडीत.
भूषण लोंढे : सातपूर गोळीबार प्रकरण, विविध गुन्ह्यांत फरार.
मामा राजवाडे : भाजप पदाधिकारी, विसे मळा गोळीबार प्रकरण, पोलिसांच्या ताब्यात.
अजय बागूल : भाजपमध्ये प्रवेश, विसे मळा गोळीबार प्रकरणी संशयित, सध्या फरार.
पवन पवार : शिंदे गटात सक्रिय, रील्सद्वारे दहशत पसरवणे, सध्या फरार.
राकेश कोष्टी : भाजप पदाधिकारी, सध्या जामिनावर कारागृहाबाहेर.
विक्रम नागरे : शिंदे गटात प्रवेश, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशय, सध्या फरार.
योगेश शेवरे : शिंदे गटात प्रवेश, रील्सवरून दहशत, सध्या फरार.
रम्मी राजपूत : मंडलीक खून प्रकरणी संशय, सध्या कारागृहाबाहेर.
रोहित कुंदलवाल : खंडणी, खुनाचा प्रयत्न, सध्या जामिनावर.
वैभव देवरे : भाजप पदाधिकारी, सावकारीसह विनयभंगाचे गुन्हे, सध्या कारागृहाबाहेर.








