नाशिक । नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा गेल्या तीन महिन्यांपासून अद्याप सुटू शकलेला नाही. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी अजित पवार गट आग्रही आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा हा तिढा नक्की कधी सुटणार याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता लागून आहे.
जानेवारी महिन्यात राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर १७ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानूसार नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन जर रायगडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांची नियुक्त करण्यात आली. मात्र अवघ्या काही तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे गट आग्रही आहे.
रायगडमध्ये शिंदे गटाचे सर्वाधिक आमदार असतांना संख्याबळानूसार शिंदे गटाला पालकमंत्रीपद द्यावे अशी त्यांची मागणी आहे मात्र केवळ १ आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद देण्यात आल्याने शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले नाराज आहेत. गोगावले समर्थकांनी अनेकवेळा या निषेधार्थ नाराजीही व्यक्त केली. दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे ७ आमदार असतांना भाजपने पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवल्याने राष्ट्रवादीकडूनही या जागेवर दावा केला जाऊ शकतो. तर शिंदे गट देखील नाशिकसाठी आग्रही असल्याचे समजते. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर भाजप पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्यास आग्रही असल्याचे कळते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार रायगडमुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती रखडली असल्याचे बोलले जाते.
या संदर्भात गुरूवारी नाशिक दौर्यावर आलेल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. याबाबत मी भाष्य करणे उचित होणार नाही. रायगडमुळे नाशिकच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली असल्याचे विचारले असता, नाशिकमुळे रायगडचे पालकमंत्री पदाची नियुक्ती रखडली असे म्हटले तर अशी मिश्किल टिप्प्णीही त्यांनी यावेळी केली.










