नाशिक । जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम परिसरात अलीकडेच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर, नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल व कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हृदयस्पर्शी श्रद्धांजली अर्पण केली.
लष्करी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम्च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. विद्यार्थ्यांनी ताठ मानेने उभे राहत, शांततेत आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी शहीद नागरिकांना अंतिम मानवंदना दिली. या वेळी संस्थेचे प्राचार्य, शिक्षकवर्ग तसेच माजी विद्यार्थीही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध करत देशाच्या सुरक्षेसाठी सतत तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा हल्ला अत्यंत निर्दयपणे करण्यात आला आहे. शरीराने नव्हे, तर मनाने खंबीर होण्याची गरज आता अधिक भासते. भोसला स्कूलमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना यासंदर्भात योग्य प्रशिक्षण दिले जात आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये या प्रकारच्या संकटांबाबत योग्य मानसिकता तयार करणे गरजेचे झाले आहे. आम्ही अत्यंत संयमाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने यासाठी पावले उचलत आहोत.
अॅड.अविनाश भिडे, कार्याध्यक्ष भोसला स्कूल
दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. केंद्र सरकार या प्रकाराचे योग्य उत्तर देईल, यावर आमचा विश्वास आहे. मोदी सरकारने आतापर्यंत घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही स्वागतार्ह मानतो.
विद्यार्थी










