जागतिक चहा दिन विशेष : चहाचा इतिहास चीनच्या बागेपासून भारताच्या मळयापर्यंत

नाशिक । चहाला वेळ नसते, वेळेला चहा असतो!” – ही म्हण भारतातील कोट्यवधी लोकांच्या रोजच्या जीवनाशी किती चपखल जुळते हे वेगळं सांगायला नको. चहा हे केवळ एक पेय नसून अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळची निवांतता ठरलेलं आहे. मग तो आदल्या रात्रीचा थकवा असो की ऑफिसमधील ताण – एक कप चहा पुरेसा असतो. आज जागतिक चहा दिनानिमित्त आपण या अद्भुत पेयाचा इतिहास आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाकडे एक नजर टाकणार आहोत.

एका योगायोगातून सुरुवात
चहाचा उगम चीनमध्ये इ.स.पू. 2700 साली झाला, अशी कथा सांगितली जाते. चीनचा सम्राट शेन नुंग बागेत बसून उकळलेलं पाणी घेत होता, तेवढ्यात एका झाडाचं पान त्यात पडलं. पाण्याचा रंग बदलला, आणि चव घेतल्यावर त्याला ती चव इतकी आवडली की चहाचा जन्म झाला! त्याच्या प्रवासाने पुढे भारत, जपान, युरोप आणि अखेर जगभर व्यापला गेला.

भारतात चहा – बौद्ध भिक्षूं पासून ब्रिटीशांपर्यंत
भारतामध्ये चहा मूळचा नव्हता. मात्र, आज भारत त्याच्या उत्पादनात आणि उपभोगातही आघाडीवर आहे. सहाव्या शतकात एक भारतीय बौद्ध भिक्षू ध्यान करताना जागृत राहण्यासाठी एका विशिष्ट वनस्पतीची पाने चघळायचा – तीच वनस्पती पुढे चहा म्हणून ओळखली गेली.

सोळाव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात चहा आणला आणि आसाममध्ये पहिली चहाची बाग सुरू केली. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम हे आज भारतातील प्रमुख चहा उत्पादक भाग आहेत. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या मते, भारतात उत्पादित होणार्‍या चहापैकी तब्बल ८०% चहा देशातच वापरला जातो.

जागतिक चहा दिनाचा उद्देश आणि महत्त्व
चहाचा जागतिक व्याप, त्यामागील शेतकरी व कामगारांची स्थिती, आणि व्यापारातील पारदर्शकता यावर जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक चहा दिन साजरा केला जातो. २००५ साली पहिल्यांदा १५ डिसेंबर रोजी मुंबईतील बैठकीत आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा झाला.

पुढे २०१५ साली भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न व कृषी विभागाला (FAO) प्रस्ताव दिला की जागतिक स्तरावर याचे महत्त्व वाढवावे. त्यानुसार २१ मे हा दिवस जागतिक चहा दिन म्हणून घोषित करण्यात आला.

प्रत्येकाचा वेगळा स्वाद
कुणाला आद्रकवाला चहा आवडतो, कुणाला साखरविरहित ग्रीन टी; कुणी ब्लॅक टी तर कुणी मसाला चहा. चहा प्रत्येकासाठी वेगळा असतो, पण भावनिक बंध तयार करणारा असतो. आजच्या या जागतिक चहा दिनानिमित्त, एका कपातून जगभरातील सांस्कृतिक वैविध्य, ऐतिहासिक प्रवास आणि सामाजिक अर्थाचे दर्शन घडते – यापेक्षा अजून काय पाहिजे?

error: Content is protected !!