मिरा-भाईंदर : मराठी भाषेला न्याय मिळावा, मराठी माणसाला हक्काचे स्थान मिळावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उद्या, सोमवार ८ जुलै रोजी मिरा-भाईंदर शहरात भव्य “मराठी अस्मिता मोर्चा” काढण्यात येणार आहे. या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेसह ‘उबाठा’ संघटनेच्या काही पदाधिकार्यांना नोटिसा बजावल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या नोटिसांचा निषेध करत मोर्चा नियोजित वेळेतच निघणार असल्याचा ठाम इशारा मनसेने दिला आहे.
मराठी आमची आई आहे – अविनाश जाधव
मोर्चा सकाळी १० वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होईल आणि मिरा रोड रेल्वे स्थानकाजवळ त्याची सांगता होईल. यावेळी मराठी अस्मिता, भाषा आणि हक्क यावर विशेष भर दिला जाणार आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले, मराठी आमची आई आहे, तिच्या सन्मानासाठी कोणताही गुन्हा घ्यायला तयार आहोत. आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही.
पोलिसांवर सत्ताधार्यांचा दबाव? मनसेचा आरोप
पोलिसांनी नोटिसा बजावल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पोलिस हे सत्ताधार्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत मनसेने ही कारवाई लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. या मोर्च्यामुळे शहरात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिस आणि प्रशासन सज्ज आहेत.
मराठी समाज एकत्र – ‘मराठी एकजूट’चा निर्धार
मिरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याच्या आणि मराठी माणसांवर अन्याय होत असल्याच्या आरोपांमुळे सर्व मराठी संघटना, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक एकत्र आले आहेत. विशेषतः, काही समाजांकडून मराठी भाषेविरोधात मोर्चा काढण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, मराठी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच निषेधार्थ ‘मराठी एकजूट’ अंतर्गत सर्व मराठी संघटनांनी एकत्र येत भव्य मोर्चा आयोजित केला आहे.











