राष्ट्रीय एकात्मतेसाठी मंगल कलश यात्रा – भुजबळ

नाशिक । आपला महाराष्ट्र हा केवळ भौगोलिक नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही देशाचा कणा आहे. या भूमीला सहज काहीही मिळालेले नाही. एकात्मतेचा संदेश देणारी ‘मंगल कलश यात्रा’ ही केवळ धार्मिक किंवा राजकीय उपक्रम नसून, ती आपल्या सामाजिक चेतनेचा सन्मान आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सध्या सुरू असलेल्या ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा’ अंतर्गत नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. या वेळी त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करून विविध क्षेत्रांतील थोर नेत्यांच्या वारसांचा गौरव केला. कार्यक्रमात लोकशाहीर वामनदादा कर्डक, साहित्यिक बाबुराव बागुल, ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर, समाजसुधारक दादासाहेब गायकवाड आणि स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर यांच्या वारसांचा भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्याच्या जडणघडणीत प्रत्येकाचा सहभाग – भुजबळ
भुजबळ म्हणाले, गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने विविध संघर्षांतून वाटचाल करत आपली ओळख निर्माण केली आहे. ही यात्रा म्हणजे त्या संघर्षाचा आणि यशाचा उत्सव आहे. राज्याच्या स्थापनेसाठी १०६ हुतात्म्यांचे बलिदान विसरता कामा नये. त्यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक पवित्र स्थळाची माती व पाणी ‘मंगल कलशा’त संकलित करून एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. या कार्यक्रमाला आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रशांत कदम, अंबादास खैरे, योगिता आहेर, प्रेरणा बलकवडे, गौरव गोवर्धने, चेतन कासव, अ‍ॅड. चिन्मय गाढे, प्रसाद सोनवणे, संजय खैरनार, नितीन चंद्रमोरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रासाठी महाराष्ट्राचा वाटा मोलाचा – झिरवाळ
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेली ही रथयात्रा केवळ स्मरणरूप न रहाता जनतेच्या मनात देशभक्ती आणि सामाजिक सलोख्याचे बीज पेरणारी ठरते आहे. या यात्रेत सर्व समाजघटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.

गौरवशाली महोत्सवाचे आयोजन
या यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात सहा विभागांमधून रथ यात्रा सुरू असून, ती सर्व १ मे रोजी मुंबईतील जांबोरी मैदानावर एकत्रित येणार आहे. तिथे १ ते ४ मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव होणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्राची यशोगाथा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, चित्रकला प्रदर्शन, आर्ट कॅम्प अशा विविध माध्यमातून राज्याचा समृद्ध वारसा सादर केला जाणार आहे.

error: Content is protected !!