मुंबई । महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, विशेषतः शहरी भागांमध्ये ही समस्या अधिक गंभीर होत आहे. पूर्वी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा कुपोषणासाठी ओळखला जात होता. मात्र, अलीकडील सरकारी आकडेवारीनुसार महानगरांमध्येही कुपोषणाची तीव्रता वाढली आहे.
राज्यभरात एकूण 1 लाख 82 हजार 443 कुपोषित बालके असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 1 लाख 51 हजार 643 बालके मध्यम कुपोषित तर 30,800 बालके तीव्र कुपोषित आहेत. विशेष बाब म्हणजे मुंबई उपनगरात सर्वाधिक म्हणजे 16,344 कुपोषित बालके असून, त्यातील 2,887 बालके तीव्र स्वरूपात कुपोषित आहेत. तर नाशिकमध्ये ९ हजार ८५२ कुपोषित बालके असल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागांत कुपोषणाचा वाढता कल विशेषतः चिंता निर्माण करणारा आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध पोषण योजनांवर प्रचंड खर्च होऊनही अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हानिहाय कुपोषणाचा आढावा:
नाशिक: 9,852 कुपोषित बालके (1,852 तीव्र)
पुणे: 9,076 कुपोषित बालके (1,666 तीव्र)
ठाणे: 8,210 कुपोषित बालके (844 तीव्र)
धुळे: 8,118 कुपोषित बालके (1,741 तीव्र)
छत्रपती संभाजीनगर: 7,926 कुपोषित बालके (1,439 तीव्र)
नागपूर: 8,088 कुपोषित बालके (1,373 तीव्र)










