मालेगाव अत्याचार प्रकरण ; चित्रा वाघ भावूक, आरोपीच्या फाशीची मागणी

नाशिक । मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणाने राज्यभरात संताप उसळला आहे. या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन कठोर शब्दांत संताप व्यक्त केला.
नाशिक जिल्हयाच्या मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारांनतर तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी डोंगराळे येथे भेट देत पीडीत चिमुकलीच्या कुटूंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

यावेळी चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले. डोंगराळे येथील पीडितांच्या घरी गेल्यावर कुटुंबीयांनी भेदरलेल्या आवाजात न्यायाची मागणी केली. घरातील वातावरण पाहून चित्रा वाघ स्वतःही गहिवरल्या. तुमच्या मुलीसाठी न्याय मिळवण्याची जबाबदारी मी घेतली आहे. हा राक्षस सुटणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

वाघ यांची खदखद
वाघ म्हणाल्या, ती तीन-साडेतीन वर्षांची निरागस फुलासारखी मुलगी तिच्यावर जे घडले ते शब्दांत मावणार नाही. एका आईचे, एका महिलेचे मन यातून विदीर्ण होत आहे. अपराध इतका भीषण आहे की अशा राक्षसांसाठी कायद्यातली शिक्षा अपुरी वाटते. त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी अर्ध्या तासात आरोपीला पकडले हे कौतुकास्पद आहे. मात्र, आता त्याला न्यायालयात कठोरात कठोर शिक्षा फाशी झाल्याशिवाय समाजाला शांतता मिळणार नाही. असे त्या म्हणाल्या.

फाशीची मागणी
वाघ यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून या प्रकरणाचा पाठपुरावा वेगाने सुरू आहे.
हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यास मी स्वतः प्रयत्न करणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या खटल्यासाठी सर्वोत्तम सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!