मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीला जाऊन आले. या दौर्यात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली. महायुतीच्या घटक पक्षांच्या मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याने अशा लोकांबरोबर काम करणे अवघड झाल्याचे फडणवीस यांनी शहा यांना सांगितल्याचे खासदार राऊत म्हणाले. सप्टेंबरपर्यंत वाट पाहा, तुम्हाला समजेलच, असं सूचक विधानही राऊत यांनी केले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीत झालेल्या हालचालींमुळे राज्यात सत्तांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून सांगितले आहे की, मित्रपक्षांसोबत काम करणं आता कठीण झालं आहे. सरकारची प्रतिमा मलिन होते आहे आणि निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
मंत्र्यांवर कारवाई होण्याची शक्यता
राज्यात अलीकडे कृषी खात्याच्या बदलासह अन्य खात्यांमध्ये फेरबदल झाले आहेत. माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओमुळे कारवाई झाल्यानंतर संजय राऊत यांनी आणखी काही मंत्र्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ते म्हणाले, वसईच्या आयुक्तांवर १००० कोटींच्या प्रकरणात छापे पडले आहेत. या प्रकरणात एक मंत्री अडचणीत येऊ शकतात. फक्त खातं बदलून प्रश्न सुटणार नाही. त्यांनाही जावं लागेल.
फडणवीसांवर ताण वाढतोय?
राऊतांनी फडणवीसांवर टीका करत म्हटले की, सध्या संपूर्ण सरकारचं ओझं फडणवीस यांच्यावर पडलं आहे. त्यांनाही हे ओझं आता झुगारून द्यावं असं वाटतं आहे. हे खातेबदल ही तात्पुरती उपाययोजना आहे. जनतेची आणि कार्यकर्त्यांची नाराजी यामुळे शमणार नाही.
सप्टेंबरमध्ये मोठी घडामोड?
काही मोठं घडणार आहे. फक्त थोडी वाट पाहा. सप्टेंबरपर्यंत सर्व स्पष्ट होईल, असे सूचक विधान करत राऊत यांनी आगामी राजकीय उलथापालथीचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले असून, पुढील काही आठवडे राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








