नाशिक – जय भवानी रोड येथील सिंग मळा, थोरात मळा आणि परिसरात बिबट्याच्या वारंवार दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका उद्यानात जिम करत असलेल्या बाबू नावाच्या युवकाला अचानक बिबट्या दिसला. त्याच वेळी उपस्थित असलेल्या रीपीयल सिंग यांनी आरडा-ओरड केल्यानंतर बिबट्या झाडीत लपून बसला.
घटनेची माहिती मिळताच मनसे शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ वनाधिकारी शरद अस्वले यांना संपर्क साधून माहिती दिली. वनअधिकारी येईपर्यंत नितीन पंडित, रिपीयल सिंग आणि काही नागरिकांनी फटाके फोडत बिबट्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सुरक्षेसाठी लाठ्या आणि काट्यांसह परिसरात पाळत ठेवली.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लहान मुले बाहेर खेळायला जात नाहीत, तर मॉर्निंग वॉक करणार्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. अॅड. नितीन पंडित यांनी वनविभागाकडे पिंजर्यांची संख्या वाढवण्याची, तसेच योग्य ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. सध्या जिथे पिंजरा लावण्यात आला आहे, त्या ठिकाणी बिबट्याचा वावर शक्य नाही.
त्यामुळे वन विभागाने बिबट्याच्या हालचाली लक्षात घेऊन योग्य ठिकाणी पिंजरे लावून त्यात भक्ष ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वनविभागाकडून देखील परिसरात गस्त वाढवण्यात आली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










